गुडेवारांशी पंगा घेतला अन् आमदारकी गमावली!

धर्मेंद्र पवार 9890080121:09-Jul-2020


सांगली- सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार यांच्या बदलीसाठी आमदार सुरेश खाडे यांनी ग्रामविकास मंत्र्यांना पत्र दिले आणि यासंदर्भात उलटसुलट चर्चेला सुरुवात झाली. पण गुडेवार यांच्याशी घेतलेला पंगा आणि त्यांच्या बदलीसाठी पुढाकार घेतल्याने आमदारकी गमवावी लागल्याचा इतिहास अमरावतीत नोंदवला गेला आहे. 

प्रामाणिक आणि कायद्याच्या चाकोरीत काम करणारे अधिकारी राजकारण्यांना नकोसे होतात. हे समीकरण चंद्रकांत गुडेवार यांनाही लागू होते. कर्तव्यदक्ष आणि प्रामाणिक अधिकारी अशी त्यांची ओळख आहे. चुकीच्या कामासाठी येणारा दबाव त्यांनी नेहमीच झुगारून दिला. भ्रष्ट प्रवृत्तीला रोखतानाच अशा पद्धतीने कामे करणार्यांवर कठोर कारवाई केली. सध्या ते सांगली जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. तसेच त्यांच्याकडे आता मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचीही जबाबदारी आहे. सांगलीत आल्यापासून त्यांनी आपल्या शैलीमध्ये कामकाज सुरू केले. परिणामी अनेकांचे हितसंबंध दुखावले गेले. अगदी आमदारही अपवाद राहिले नाहीत. मिरजचे आमदार सुरेश खाडे यांनी गुडेवार यांच्या बदलीसाठी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना पत्रही दिले. यामुळे सांगलीच्या वर्तुळात जोरदार उलटसुलट चर्चा झाली. गुडेवार यांना विविध स्तरातून पाठिंबाही मिळाला. आजवरच्या प्रत्येक पदावर त्यांनी याचपद्धतीने काम केले आणि लोकांचे हित जपण्यासाठी प्राधान्य दिले.


आमदाराला घेतले अंगावर

अमरावती महापालिकेचे आयुक्त म्हणून कार्यरत असताना गुडेवार यांनी अतिशय धडाकेबाज काम केले होते. भ्रष्ट यंत्रणा मोडीत काढली होती. भ्रष्टाचाराला लगाम घालताना स्थानिक आमदार डाॅ. सुनिल देशमुख यांनाही त्यांनी अंगावर घेतले होते. देशमुख यांनी हा विषय आमदाराच्या विशेषाधिकाराचा बनवून विधानसभेत नेला. यातून देशमुख-गुडेवार जोरदार संघर्ष झाला होता.

...आणि आमदारकी गमावली

राजकीय दबावामुळे अखेर चंद्रकांत गुडेवार यांची बदली झाली. तरीही दोघातला संघर्ष कमी झाला नव्हता. नंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत देशमुख यांच्या विरोधी उमेदवारांने गुडेवार यांच्या स्वच्छ तर देशमुख यांच्या भ्रष्ट कारभाराचा मुद्दा जोरदारपणे उचलून धरला. गुडेवार यांच्याशी संघर्ष केल्याने निर्माण झालेल्या प्रतिमेचा मोठा फटका सुनिल देशमुख यांना बसला आणि देशमुख निवडणुकीत पराभूत झाले. निवडणुकीच्या निकालानंतर विजयी उमेदवाराबरोबरच गुडेवार यांच्यावरही अभिनंदनाचा वर्षाव झाला होता. कारण 8 लाख आमरावतीकरांना ही बाब माहिती होती. आता सांगलीतही गुडेवार यांच्या बदलीसाठी आमदारांनी पत्र दिल्याने अमरावतीच्या घटनेला उजाळा मिळाला आहे.