जिगरबाज आणि धडाकेबाज!

धर्मेंद्र पवार 9890080121:18-Jul-2020


पोलिस दलात काम करताना सर्वांत महत्त्वाची असते ती जिगर. सतत कार्यरत राहण्याची वृत्ती, सखोल अभ्यास, नियोजन आणि येणारा दबाव झुगारून देऊन कठोरपणे ज्याला काम करता येते, तोच यशस्वी पोलिस अधिकारी. या सार्‍या गुणांचा समुच्चय असलेल्या अनेक अधिकार्‍यांनी महाराष्ट्र पोलिस दलाचे नाव उज्ज्वल केले. अशक्य कोटीतील वाटणारे तपास पूर्ण केले. असंख्य गुन्हेगारांना जेरबंद केले. अगदी बड्या राजकीय गुन्हेगारांना गजाआड केले. मनापासून सॅल्युट करावा अशा अधिकार्‍यांपैकी एक म्हणजे विश्‍वजित काईंगडे. त्यांच्या जिगरबाज आणि धडाकेबाज कामाचा हा आढावा...

गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त भागात पोलिस दलाची प्रतिमा उजळून टाकणारी कामगिरी, ठाणे ग्रामीणमध्ये घरफोड्यांच्या गुन्ह्यांचा केलेला तपास, संपूर्ण महाराष्ट्राचे राजकीय वातावरण ढवळून टाकणार्‍या जळगावातील घरकुल घोटाळ्याचा तपासामध्ये सहभाग, ७० हून अधिक घरफोडीचे उघडकीस आणलेले गुन्हे, सलग १८ महिने ‘ऑफिसर ऑफ द मंथ पुरस्कार’ अशी कामगिरी करणारा अधिकारी जिगरबाजच असायला हवा.

विश्‍वजित काईंगडे हे मूळचे कोल्हापूरचे. पन्हाळा तालुक्यात त्यांचे गाव. कोल्हापुरातील एका महाविद्यालयातून त्यांनी बी.एस्सी.चे शिक्षण घेतले. महाविद्यालयीन जीवनात खेळ, साहित्य, संगीत, वाचन, संमेलने अशा उपक्रमांत त्यांचे मन रमून गेले होते. काहीसा अभ्यासावरचा फोकस शिफ्ट झाला होता. त्यांची कारकीर्द पाहता या गोष्टीच त्यांच्यासाठी उपयोगी ठरल्या, असे म्हणता येईल; पण त्या काळात त्यांच्या पालकांना काळजी वाटणे साहजिकच होते. महाविद्यालयीन आयुष्यात आपल्याला ‘आर्म्ड फोर्स’मध्ये जायचे आहे, हे त्यांच्या मनाने निश्‍चित केले होते. कम्बाइन्ड डिफेन्स सर्व्हिसची परीक्षा ते तिनदा उत्तीर्ण झाले. त्यानंतर पाच ते सहा दिवस चालणार्‍या एसएसबी मुलाखतीमध्ये मात्र त्यांना यश आले नाही. त्यासाठी त्यांना कोल्हापुरातील निवृत्त कर्नल काटकर आणि शिवाजी थोरात यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले; ‘तू परीक्षा पास झाला असलास तरी इंटरव्ह्यू देऊ नकोस’ असे काटकर यांनी त्यांना सांगितले होते. मात्र त्याकडे दुर्लक्ष करीत मुलाखत देण्याचा प्रयत्न केला आणि काटकर यांनी म्हटल्याप्रमाणे ते मुलाखतीत यशस्वी होऊ शकले नाहीत. पुन्हा त्यांनी याच परीक्षेची तयारी सुरू केली. सल्ल्यासाठी ते पुन्हा काटकर यांच्याकडे गेले. त्यावेळी काटकर त्यांना म्हणाले, या परीक्षेसाठी ताजे टॅलेंट लागते. पहिल्यांदाच मुलाखत देणारा उमेदवार या परीक्षेत यशस्वी होतो. आता तू एकदा मुलाखत दिली आहेस, त्यामुळे त्यांना अधिक अपेक्षा असणार आहेत. काटकर यांनी सांगितले तसेच झाले आणि दुसर्‍या वेळीही काईंगडे यांना यश आले नाही.

सविस्तर लेख वाचा