कोल्हापुरात प्रवेशबंदी !!

ई परवाना न देण्याचे सर्व जिल्हाधिकार्यांना आवाहन

अमृतवेल Live:18-Jul-2020


कोल्हापूर- कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा विळखा घट्ट होवू लागला आहे. विशेषतः मुंबई- पुण्यासह बाहेरून येणार्यांमध्ये संसर्गीत व्यक्तींचा समावेश वाढत आहे. शहर आणि जिल्ह्यातील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी बाहेरून जिल्ह्यात येण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. तसे पत्र जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी यांना पाठवले आहे.


कोल्हापूर जिल्ह्यातील वाढती कोरोना रूग्ण संख्या लक्षात घेता सोमवार दि 20 ते 26 जुलै दरम्यान कडक लाॅकडाऊन घोषित करण्यात आला आहे. याबरोबरच इतर उपाययोजनाही सुरू करण्यात आल्या आहेत. याअंतर्गत बाहेरील जिल्ह्यातून कोल्हापुरात येण्यासाठीही याकाळात बंदी घालण्यात आली आहे. कोल्हापूरात येण्यासाठी इतर जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त तसेच जिल्हा पोलीस प्रमुख यांच्या माध्यमातून ई-पास दिला जातो, तो पुढील दोन आठवडे देण्यात येवू नये, विनंती करण्यात आली आहे. तसे पत्र जिल्हाधिकारी देसाई यांनी सर्वांना पाठवले आहे. म्हणजेच दोन आठवडे बाहेरून कोल्हापूर जिल्ह्यात प्रवेश मिळणार नाही. केवळ वैद्यकीय तातडीच्या उपचारासाठी आणि मालवाहतूक व अत्यावश्यक सेवांना प्रवेश दिला जाणार आहे.