ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचा उतावीळपणा, नामुष्की ओढवली

अमृतवेल LIVE - धर्मेंद्र पवार:24-Jul-2020


मुंबई - आघाडी सरकारमध्ये एककल्ली निर्णय घेवून चालत नाही, सर्वसमावेशक निर्णयप्रक्रिया राबवावी लागते. हे तर महाआघाडी सरकार आहे. त्यामुळेच उर्जामंत्री नितीन राऊत यांना त्यांचा उतावीळपणा चांगलाच नडला आहे. त्यांनी घेतलेले निर्णय रद्द करावे लागले आणि त्यांना नामुष्कीला सामोरे जावे लागले.
महाआघाडी सरकारच्या धुरिनांनी सत्तेचा समन्वय साधला आहे. शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस, मित्रपक्ष आणि अपक्ष यांना त्यांच्या क्षमतेनुसार सरकारमधील सहभाग आणि सत्तेतील वाटा दिला गेला आहे. त्यानंतरही राज्यसभेच्या जागा असोत की विधान परिषद तिथेही यथायोग्य फॉर्म्यूला तयार केला गेला. आता आगामी काळात विविध महामंडळाच्या पदाधिकारी निवडीची प्रक्रिया होईल आणि तिथेही अशीच सर्वसमावेशक निर्णयप्रक्रिया राबविली जाईल.

मात्र तोपर्यंत आपल्या मंत्रीपदाचे अधिकार आणि ऊर्जा विभागामध्ये स्वंतत्रपणे निर्णय घेवू शकतो हे दाखवण्याच्या नादात त्यांनी विविध उर्जा कंपन्यांवर अशासकीय सदस्य व संचालकांच्या नियुक्त्या केल्या. यामध्ये महापारेषण, महावितरण आणि इतर होल्डिंग कंपन्यांवर सोळा जणांची नेमणूक केली होती. हा मोठा निर्णय घेत असताना त्यांनी मुख्यमंत्रीच नव्हे तर कॉंग्रेस नेत्यांशीही सल्लामसलत केली नव्हती. अर्थात हे महाआघाडीच्या मुख्य घटक पक्षांना कदापि रूचणारे नव्हते. परस्पर नियुक्त्यांची माहिती पुढे येताच गदारोळ झाला. मुख्यमंत्र्यांसह शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. इतकेच नव्हे तर कॉंग्रेसचेही अनेक नेते राऊत यांच्या या निर्णयावर नाराज झालेे. अखेर हा निर्णय नितीन राऊत यांना मागे घ्यावा लागला आणि अशासकीय सदस्यांच्या केलेल्या नियुक्त्या रद्द कराव्या लागल्या.

एका बाजूला महाआघाडी सरकारमध्ये समन्वय नाही असा आरोप विरोधी पक्षांकडून केला जात असल्याच्या पार्श्‍वभूमीवर राऊत यांनी महाआघाडी अंतर्गत गोंधळ चव्हाट्यावर आणला. आता यानिमित्ताने तिन्ही पक्षांनी एकत्र बसून सर्व नियुक्त्या लवकरात लवकर कराव्यात, अशी मागणी तिन्ही पक्षांमधून पुढे येत आहे.