समजून घ्या अभ्यासक्रमातील कपात

पहिली ते चौथी कोणत्या वर्गासाठी काय आहे बदल

अमृतवेल live:26-Jul-2020


पुणे : वाढत्या कोरोनाच्या संसर्गामुळे यंदा अद्याप शैक्षणिक वर्ष सुरू झालेले नाही. तसेच कधी सुरू होईल याविषयीही अनिश्चितता आहे. त्यामुळे राज्य शासनाने चालू शैक्षणिक वर्षासाठी पहिली ते बारावीपर्यंतचा 25 टक्के अभ्यासक्रम कमी करण्याच्या राज्य शैक्षणिक व प्रशिक्षण परिषदेच्या प्रस्तावास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती ट्विटरद्वारे दिली आहे.

वर्षा गायकवाड यांनी यासंदर्भात सांगितले की, कोरोनामुळे यंदा अद्यापही शाळा सुरू झाल्या नाहीत. त्यामुळे अभ्यासक्रम कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भातील अधिक माहिती संचालक राज्य शैक्षणिक व संशोधन परिषद, पुणे या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.

101 विषयांचा 25 टक्के पाठ्यक्रम कमी

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र , महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ (बालभारती) आणि महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (बोर्ड) यांच्या समन्वयाने आणि अभ्यासक्रम समितीच्या निर्णयानुसार संबंधित विषयाचे सर्व अभ्यासक्रम मंडळ सदस्यांमार्फत शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी अभ्यासक्रमाचा मूळ गाभा तसाच ठेऊन प्राथमिक स्तरावरील 22, माध्यमिक स्तरावरील 20 आणि उच्च माध्यमिक स्तरावरील 59 असे एकूण 101 विषयांचा इयत्ता निहाय, विषय निहाय 25% पाठ्यक्रम कमी करण्यात येत असल्याची माहिती प्रा. गायकवाड यांनी दिली आहे.

असा आहे निर्णय:

पाठ्यक्रमातून 25 % भाग वगळत असताना भाषा विषयामध्ये काही गद्य व पद्य पाठ व त्यावर आधारित स्वाध्याय कृती वगळण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी अंतर्गत मूल्यमापन आणि वार्षिक परीक्षा यामध्ये या घटकांवर कोणत्याही कृती विचारल्या जाणार नाहीत.

  • भाषा विषयामध्ये वगळण्यात आलेल्या पाठाला जोडून आलेले व्याकरण किंवा इतर भाषिक कौशल्य वगळण्यात आलेली नाहीत.
  • इतर विषयामध्ये कृतीची पुनरावृत्ती टाळणे तसेच काही भाग विद्यार्थ्यांना स्वयंअध्ययनासाठी देण्यात आला आहे.
  • शालेय श्रेणी विषयासंदर्भात परिस्थिती व त्यानुसार उपलब्ध सोयी सुविधा यांचा विचार करून उपक्रम / प्रकल्प घेण्याबाबत सूचित केले आहे.
  • प्रात्यक्षिकांवर आधारित विषयांचे प्रात्यक्षिक कार्य हे अध्ययन – अध्यापन संदर्भाने विचारात घेतलेल्या आशयास अनुसरूनच उपलब्ध परिस्थिती व सोयी सुविधा विचारात घेवून पूर्ण करणेबाबत सूचित केले आहे.
  • राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांच्या मार्फत शैक्षणिक दिनदर्शिकेची निर्मिती केली आहे. त्या दिनदर्शिकेमधून पाठ्यक्रमातून कमी करण्यात आलेला भाग वगळण्यात येत आहे.
  • इयत्ता 1 ली ते 12 वी चा इयत्ता निहाय, विषय निहाय 25 % पाठ्यक्रम कमी करण्यात आलेला भाग www.maa.ac.in आणि www.ebalbharati.in या वेबसाईट वर प्रकाशित करण्यात येत आहे.
  • शाळा प्रमुखांमार्फत शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी सदर पाठ्यक्रम वगळल्याची नोंद घेवून त्याबाबत सर्व विद्यार्थी, शिक्षक व पालक यांना अवगत करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.

वर्षा गायकवाड यांचा ट्विटरवरील व्हिडिओ पाहण्यासाठी...