कोरोनातील बेरोजगारांना भगीरथ देणार रोजगार!

अमृतवेल live - धर्मेंद्र पवार:28-Jul-2020


मुंबई- कोरोनामुळे महानगरी मुंबई जणू थांबली आहे. एकूणच बाजारपेठ ठप्प आहे. उद्योग- व्यवसाय बंद आहे. चाकरमाने आपापल्या गावाकडे दाखल झाले आहेत. कोरोनामुळे बेरोजगार होऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यात आलेल्या या बेरोजगारांना इथेच रोजगार देण्याचे नियोजन भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेने हाती घेतले.

कोरोनामुळे शहरातून पुन्हा आपल्या गावाकडे आलेल्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे. एकट्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात साधारणपणे एक ते सव्वा लाख लोक परतले आहेत. गावाकडून रोजगाराच्या शोधात शहरात गेलेल्या असंख्य तरूणांना पुन्हा सामावून घ्यावे लागणार आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेसमोरील हे आव्हान आहे. ते पेलण्यासाठी नेटक्या नियोजनाची नितांत आवश्यकता आहे. त्यांना त्यांच्या कौशल्याप्रमाणे रोजगार उपलब्ध करून देण्याचा संकल्प आम्ही केला असल्याचे भगीरथचे संस्थापक डाॅ. प्रसाद देवधर यांनी सांगितले.


भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध उपक्रम राबवित आहे. या प्रकल्पांद्वारे ग्रामीण अर्थव्यवस्था भक्कम केली जात आहे. शेतीतील बदलांबरोबरच शेतीपूरक व्यवसायाला प्रोत्साहन दिले जात आहे. ग्रामीण विकासाचे एक नवे माॅडेल भगीरथने उभे केले आहे.

आता कोरोनामुळे नवी आव्हाने उभी ठाकली आहेत. शहरातील स्थलांतरीतांना ग्रामीण व्यवस्थेत सामावून घ्यावे लागणार आहे. भगीरथने या सर्वांची माहिती संकलीत करण्यास सुरूवात केली आहे. तसेच त्यांच्या भेटी घेवून त्यांच्याशी चर्चाही सुरू केली आहे. या तरूणांना सामावून घेतील असे उद्योग शोधून काढले जात आहेत. त्यासाठी मोठे उद्योग, उद्योग संघटना, नेते तसेच बॅकाशीही चर्चा केली जात असल्याची माहितीही डाॅ. देवधर यांनी दिली.

(ʹभगीरथʹच्या कामाचा, वाटचालीचा आणि आत्मनिर्भर उपक्रमांचा आढावा अमृतवेल गव्हर्नन्स अंकामध्ये लवकरच वाचा....)