पॉलिसी नूतनीकरणासाठी एल्आयसीची विशेष योजना

अमृतवेल live:12-Aug-2020


मुंबई - भारतीय आयुर्विमा महामंडळाने (एलआयसी) बंद पडलेल्या विमा पाॅलिसीच्या नुतनीकरणासाठी विशेष सवलत योजना जाहीर केली आहे. काही कारणास्तव बंद पडलेल्या विमा पॉलिसीच्या नूतनीकरणासाठी घेतल्या जाणाऱ्या विलंब शुल्कामध्ये या योजनेअंतर्गत सवलत देण्यात येणार आहे. 9 ऑक्टोबरपर्यंत ही मोहीम चालणार आहे.

मात्र या विशेष मोहिमेमध्ये वैद्यकीय निकषांसंदर्भात कोणत्याही सवलती लागू होणार नाहीत आणि सवलती केवळ विलंब शुल्कापुरत्याच मर्यादित असतील; तसेच टर्म ऑशुरन्स, आरोग्य विमा, मल्टिपल रिस्क पॉलिसीज आदी प्रकारच्या उच्च जोखीम असलेल्या पॉलिसीच्या नूतनीकरणाला ही सवलत लागू असणार नाही, असे एलआयसीतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. या पॉलिसी सोडून इतर पॉलिसीचे प्रीमियम न भरल्याच्या तारखेपासून पाच वर्षांच्या आतला कालावधी असलेल्या पॉलिसींचे नूतनीकरण या योजनेत करता येणार आहे. त्यासाठी विशिष्ट अटी आणि नियम लागू असणार आहेत. १,००,००० रुपयांपर्यंतच्या प्रीमियमसाठीच्या विलंब शुल्कात वीस टक्के (कमाल सवलत पंधराशे रुपये), १,००,००१ ते ३,००,००० रुपयांपर्यंतच्या प्रीमियमसाठीच्या विलंब शुल्कात पंचवीस टक्के (कमाल सवलत दोन हजार रुपये) आणि ३,००,००१ रुपयांच्या पुढच्या प्रीमियमसाठीच्या विलंब शुल्कात तीस टक्के (कमाल सवलत अडीच हजार रुपये) सवलत देण्यात येणार आहे.

ज्या पॉलिसीधारकांना अपरिहार्य कारणांमुळे प्रीमियम भरता आले नाहीत
आणि त्यामुळे त्यांची पॉलिसी बंद पडली आहे, अशा पॉलिसीधारकांसाठी ही योजना तयार करण्यात आली आहे, असे प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.