कहाणी एका जिद्दीची

धर्मेंद्र पवार:17-Aug-2020


परिस्थिती, गरिबी अथवा येणार्‍या अडचणी तुम्हाला शिक्षण आणि तुमच्या ध्येयापासून रोखू शकत नाही. फक्त तुमच्याकडे हवी जिद्द. ही जिद्दच तुमचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी पूल तयार करील. वेळोवेळी येणार्‍या अडचणींवर मात करण्यासाठीचा मार्ग दाखवेल... अशीच एक जिद्दीची कहाणी लिहिली आहे, सहाय्यक आयकर आयुक्त डॉ. सचिन मोटे यांनी. सांगली जिल्ह्यातील कायम दुष्काळी अशा आटपाडी तालुक्यातील विभुतेवाडी गावातून मेंढपाळाचा मुलगा म्हणून सुरू झालेला त्यांचा प्रवास व्हाया एमबीबीएस, आयआरएस बनून कार्पोरेट जगताचे मुंबईतील महत्त्वाचे केंद्र असलेल्या ’बीकेसी’ येथील आयकर कार्यालयापर्यंत पोहोचला आहे. तरूणाईला अखंड प्रेरणा देणार्‍या, त्याचा आयडॉल ठरलेल्या डॉ. मोटे यांचा हा दिशादर्शक प्रवास...

आटपाडी तालुक्यातील विभुतेवाडी हे गाव सांगली- सातारा जिल्ह्याच्या सीमेवर वसलेलं. कायम दुष्काळी असलेला हा भाग. या गावची ओळख म्हणजे इथले बहुतांश लोक मुंबईत माथाडी कामगार म्हणून काम करतात. गावाकडे राहिलेल्यांपैकी विशेषतः धनगर समाजातील लोकांचा मेंढपाळ हा व्यवसाय. त्यांचाही कामाचा एक पॅटर्न असायचा. गावाकडचा चारा संपला की, लहानग्यांना घरातील वयस्कर लोकांसोबत गावीच ठेवून मेंढ्या कराड परिसरात चारायला घेऊन जायचे. ऊस तोडल्यानंतर या परिसरातील शेतांमध्ये चारा खूप असायचा, तसेच नंतर याच शेतांमधून मेंढ्या बसवल्या जायच्या. यातूनही मेंढपाळांना काहीसे उत्पन्न मिळाले. जगण्याच्या लढाईत हे स्थलांतर अटळ. अनेक वर्षांपासून सुरू असलेले हे चक्र. यामुळे मुलांच्या शिक्षणाची मात्र हेळसांडच व्हायची. शिवाय गावात शिक्षणाचे फारसे वातावरणही नसायचे. त्यातूनही काही हिरे चमकून पुढे आले. स्वकर्तृत्वाने स्वतःची ओळख बनवली. सहाय्यक आयकर आयुक्त डॉ. सचिन मोटे यांपैकीच एक.

अनेक कुटुंबांची ही ’स्टोरी’ डॉ. मोटे यांच्याही वाट्याला आलेली. सहा महिने आजी-आजोबांसोबत गावी राहायचे आणि परीक्षा संपल्या की, आईवडिलांकडे कराड परिसरात जायचे. सचिन यांचे वडील तांबवे गावी असायचे ते उघड्यावरचं जीवन सचिनही अनुभवायचे. मेंढरे राखायची. पावसाळा सुरू झाला की, पुन्हा माघारी गावी यायचं. शिक्षणासाठी आणि अभ्यासासाठीही तसे पूरक वातावरण नसायचे. अशा काहीशा निराशाजनक वातावरणात सचिन यांनी शिक्षणाची ओढ जपली.

सचिन यांचं घर गावापासून काही अंतरावर असलेल्या वस्तीवर होते. आणि याच ठिकाणी चौथीपर्यंत प्राथमिक शाळा होती. शाळेला स्वतःची इमारत नव्हती. कुणाच्या तरी घरात शाळा असायची. प्रत्येक वर्गामध्ये ४ ते ५ मुलेच असायची. त्यामुळे चार वर्गासाठी मिळून एक शिक्षक तेच सर्व विषय शिकवायचे. पाचवी ते दहावीपर्यंतचे त्यांचे शिक्षण विभूतेवाडी गावात असलेल्या हायस्कूलमध्ये झाले.

सविस्तर लेख ʹअमृतवेल गव्हर्नन्सʹ मध्ये..