जिद्दीचा अखंड झरा!

धर्मेंद्र पवार:17-Aug-2020


इच्छाशक्ती आणि जिद्द हे मानवी जीवनातील सर्वात महत्वाचे गुण आहेत. केवळ या दोन गुणांच्या जोरावर संकटांचे पहाड सहज ओलांडून जाता येते. शिक्षण असो किंवा करिअर; इच्छाशक्ती आणि जिद्द असलेल्यांना कोणीच रोखू शकत नाही. इतिहासाच्या पानांत अशीच माणसे आपले नाव ठळक अक्षरात कोरतात. उपजिल्हाधिकारी संतोष भोर अशाच जिद्दी आणि तीव्र इच्छाशक्ती असलेल्यांपैकी एक. नुकतीच त्यांची विट्याचे प्रांताधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर त्यांच्या वाटचालीचा घेतलेला हा आढावा...

शिक्षक कुटुंबात जन्म, मुलानेही शिक्षक व्हावे अशी वडिलांची असलेली इच्छा, कृषी विषयाची घेतलेली पदवी आणि त्यानंतर प्रशासकीय सेवेत जाण्यासाठी प्रयत्न आणि विविध पदांवर केलेले धडाकेबाज काम, यांमुळे संतोष भोर यांनी प्रशासकीय सेवेत स्वतःचे स्थान निर्माण केले आहे.

उपजिल्हाधिकारी संतोष भोर यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात एका छोट्या खेड्यात संविदणे येथे झाला. त्यांचे वडील शिक्षक होते. संतोष यांना दोन बहिणी आणि एक भाऊ. हे सर्वजण शिक्षण क्षेत्रात कार्यरत, त्यामुळे संतोष यांनीही शिक्षक व्हावे अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती. संतोष यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण शिरूर तालुक्यातच झाले. शिरूर तालुक्याला प्रशासकीय अधिकार्‍यांची परंपरा आहे. किशोरराजे निंबाळकर, शेखर गायकवाड, संजीव पलांडे, दीपक सप्रे, अमोल तांबे, अशा दिग्गज प्रशासकीय अधिकार्‍यांची शिरूर तालुक्याला परंपरा आहे. त्यामुळे संतोष यांनी प्रशासकीय सेवेत जावे अशी त्यांच्या बंधूंची इच्छा होती. आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार संतोष यांनी वाटचालीला सुरुवात केली.

बारावीनंतर संतोष यांनी कृषी विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. यादरम्यान स्पर्धा परीक्षेची आवड असणार्‍या मित्रांचा ग्रुप तयार झाला; पण तेव्हा कुणाचीच आर्थिक परिस्थिती फारशी सक्षम नव्हती. त्यामुळे शिक्षण घेत असताना सर्वांनी १०० रुपये वर्गणी काढून माजी विद्यार्थ्यांकरवी शिकवण्यांना सुरुवात केली. यातून स्पर्धा परीक्षेचे स्वरूप लक्षात आले आणि संतोष यांची पुढील दिशा स्पष्ट झाली. एम.एस्सी.साठी त्यांनी राहुरीला प्रवेश मिळविला. राहुरी हे प्रशासकीय अधिकार्‍यांचे माहेरघर मानले जाते. राहुरीत संतोष यांना चांगला ग्रुप मिळाला. समूह चर्चा, अवांतर वाचन यातून पाया भक्कम झाला. २००३ साली जाहिरात निघाली. २००४ साली पूर्वपरीक्षा, ०५ साली मुख्य परीक्षा, २००६ साली मुलाखत झाली आणि २००७ साली ते प्रशासकीय सेवेत उपजिल्हाधिकारी म्हणून दाखल झाले.

सविस्तर लेख ʹअमृतवेल गव्हर्नन्सʹ मध्ये..