संकल्प इकोफ्रेंडली विटा शहर

धर्मेंद्र पवार:17-Aug-2020


प्रभागनिहाय विकासकामांसाठी एक खास टीम, घनकचरा व्यवस्थापन आणि मैल्याच्या पाण्यावरील प्रक्रियेसह स्वच्छतेसाठी नियोजनबद्ध कार्यक्रम, हरित शहराच्या दृष्टिकोनातून राबविण्यात येत असलेल्या उपाययोजना, नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिने उद्याने विकसित करण्याबरोबरच ऑक्सिजन पार्कची कल्पना आणि त्यासाठी शहर आणि परिसरात हजारोच्या संख्येने वृक्षारोपणाच्या कालबद्ध कार्यक्रमाचे नियोजन अशा नानाविध उपाययोजना राबवून विटा शहराचा कायापालट करण्याचा संकल्प नगरपालिकेचे मुख्याधिकारी अतुल पाटील यांनी केला आहे, पदाधिकार्‍यांचे पाठबळ घेत सुयोग्य समन्वय राखत केवळ वर्षभरातच याचे प्रतिबिंबही दिसू लागले आहे. शहराच्या याच बदलत्या स्वरूपाची घेतलेली दखल....

सराफा व्यवसायातील गलाईचे काम करण्यात निष्णात लोकांमुळे महाराष्ट्रातील सुवर्णनगरी म्हणून ओळख असलेले विटा हे सांगली जिल्ह्यातील एक छोटे शहर. ५४ चौरस किलोमीटर परिसरात पसरलेल्या या शहराची लोकसंख्या सुमारे ५५ हजारांच्या आसपास आहे. १२ प्रभागांमध्ये विभागलेल्या विटा शहराची नगरपालिका ब वर्ग श्रेणीत मोडते. सुळकाई टेकडी, तेथील जंगल, आजूबाजूचा शेतीचा परिसर शहराच्या सुधारणांमध्ये भरच घालतो. वर्षभरापूर्वी म्हणजे जुलै २०१९मध्ये विटा नगरपालिकेचे मुख्याधिकारी म्हणून अतुल पाटील यांनी सूत्रे हाती घेतली. स्वच्छ विट्याची आता सुंदर शहर आणि इकोफ्रेंडली शहर म्हणून ओळख निर्माण करण्यासाठी मोठ्या शिकस्तीने त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. ‘स्वच्छता हाच संस्कार’ म्हणून शहरात सातत्यपूर्ण कामे सुरू असल्यामुळेच नुकताच विटा शहराला कचरा प्रक्रियेसंबंधीचे ‘थ्री स्टार’ नामांकन मिळाले आहे.

विट्याची इकोफ्रेंडली शहर म्हणून ओळख निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून मुख्याधिकारी पाटील यांनी विविध उपाययोजना राबविण्यास सुरूवात केली आहे. यामध्ये नागरिकांच्या आरोग्याचाही मोठा विचार करण्यात आला आहे. शहरातील धावपळीच्या आणि काही प्रमाणात घुसमटणार्‍या वातावरणातही नागरिकांना थोडा वेळ का होईना निवांतपणा भेटावा, त्यांचा ताणतणाव कमी व्हावा, स्वच्छ हवेत श्‍वास घेता यावा या दृष्टिकोनातूनही काम सुरू आहे. यामध्ये स्वच्छतेला तर प्राधान्य दिलेच आहे, पण इकोफ्रेंडली शहरासाठी आवश्यक निकष पूर्ण करण्यावर त्यांनी विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. शहराची भविष्यातली गरज लक्षात घेऊन वेगवेगळ्या संकल्पना राबवल्या जात आहेत.