कोरोना : बीजिंगमध्ये नवे रुग्ण, चीनमध्ये संसर्गाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता

:13-Jun-2020


जगभरात फैलाव झालेल्या जीवघेण्या कोरोना विषाणूचं केंद्र चीन होतं. शिस्तबद्ध उपाययोजनांनंतर चीनमध्ये कोरोना विषाणू नियंत्रणात आला होता. मात्र तब्बल 56 दिवसांनंतर चीनमध्ये पुन्हा कोरोनाचे नवे रुग्ण आढळले आहेत. चीनमध्ये कोरोनाचे 10 नवे रुग्ण आढळले आहेत. राजधानी बीजिंगमध्ये दोनजण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. बीजिंगमध्ये गुरुवारी (11 जून) प्रदीर्घ कालावधीनंतर कोरोनाचा रुग्ण आढळला. शुक्रवारी (12 जून) आणखी दोन रुग्ण आढळल्याने प्रशासन सतर्क झालं. 9 जून रोजी कोरोनाच्या शेवटच्या रुग्णाला हॉस्पिटलमधून घरी सोडण्यात आलं होतं. मात्र आता नव्याने रुग्ण आढळू लागल्याने प्रशासनाच्या चिंता वाढल्या आहेत. नवीन रुग्ण आढळू लागल्याने शाळा सुरू करण्याचा विचार प्रशासनाने रद्द केला आहे. दोन नवे रुग्ण हे फेंगताई जिल्ह्यातील चायना मीट फूड रिसर्च सेंटरचे कर्मचारी असल्याचं जिल्हा उपधिकाऱ्यांनी सांगितलं.