कोरोना जळगाव मृत्यू: आजींचा मृतदेह शौचालयात सापडला यामध्ये नेमकी चूक कुणाची?

:13-Jun-2020


फोन वाजला तशी गेल्या चार महिन्यात ओळखीची झालेली कॉलरट्यून वाजली. ʹआपल्याला रोगाशी लढायचंय, रोग्यांशी नाही. कोरोनाबाधितांना दूर लोटू नका, त्यांची काळजी घ्या.ʹ या वाक्याला कसंतरी झालं. ज्या हर्षल नेहतेंना फोन केला होता, त्यांनाही दिवसातून 50 वेळा ही कॉलरट्यून ऐकू येत असणार. त्यांच्या मनात काय कालवाकालव होत असेल? व्यवस्थेने, रोगाने आणि गलथानपणाने त्यांच्या बाबतीत सगळंच उलटं केलंय. त्यांच्या माणसांची ना काळजी घेतली, ना दखल, ना रोगावर इलाज केला. काळजी घेणं तर लांबच. परिवारातल्या एका बाधित व्यक्तीचा मृतदेह शौचालयात पडून राहिला तरी कोणाच्या गावीही नव्हतं. आता तपासाची चक्र फिरतायत, लोकांच्या रोषाला शांत करण्यासाठी काही वरिष्ठ अधिकारी आणि डॉक्टरांना निलंबितही केलंय, पण याने कोरोनापेक्षाही भयानक असणारा अव्यवस्थेचा रोग बरा होईल का हा प्रश्नच आहे. हर्षल नेहते यांच्या कुटुंबाने गेल्या काही दिवसात बरंच सोसलंय. मुळचे जळगाव जिल्ह्यातल्या यावलमधले असलेले हर्षल आता पुण्यात स्थायिक आहेत तर त्यांच्या घरचे गावीच असतात. "सुरुवातीला माझ्या वडिलांना कोव्हिड झाल्याचं निष्पन्न झालं. आधी काही लक्षण दिसली नाहीत, मग आईलाही त्रास सुरू झाला. मग आईवडिल दोघांनाही भुसावळमधल्या रेल्वे हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. पण तिथे नीट ट्रीटमेंट झालीच नाही. तीन दिवसांनी त्यांची तब्येत आणखी खालावली, मग दोघांनाही जळगावला हलवण्यात आलं. पण काही उपयोग झाला नाही. आईची तब्येत सिरीयस होती पण आयसीयूमध्ये बेडच अव्हेलेबल नव्हता. त्यातच आईचा मृत्यू झाला," ते सांगतात. हर्षल यांच्या 60 वर्षीय आईचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबावर दुसरं संकट ओढवलं. 82-वर्षीय आजीचीही, मालती नेहते यांचीही तब्येत बिघडली आणि त्याही कोरोना पॉझिटीव्ह असल्याचं निष्पन्न झालं. त्यांनाही तडकाफडकी जळगावला हलवण्यात आलं.