सोने, चांदी दरात बंपर तेजी

चांदी ८० हजार तर सोने ५६ हजारच्या विक्रमी स्तरावर

:07-Aug-2020


नवी दिल्ली: सोने, चांदीच्या किमती नव्या रेकॉर्ड स्तरावर जात आहेत. MCXवर सोन्याचा दर ५६ हजारच्या पुढे गेला आहे. तर चांदी ७९ हजाराच्या पुढे जात ८० हजाराच्या जवळ पोहोचली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोने दोन हजार डॉलरच्या पार जात २ हजार ५८ डॉलरवर पोहोचले आहे. हा गेल्या ७ वर्षातील सर्वोच्च दर आहे. ३१ जुलै रोजी सोन्याचा दर १ हजार ९७३ डॉलरवर बंद झाला होता. ऑगस्ट महिन्यात तो २ हजार ७२ डॉलर या सर्वोच्च स्तरावर गेला होता. चांदीचा दर २८.४० डॉलरवर गेला होता.

MCXवर सकाळी १०.४० वाजता ऑक्टोबर महिन्यात डिलिव्हरी होणाऱ्या सोन्याच्या किमतीत १५ रुपयांची घसरण झाली होती. सध्या तो ५५ हजार ८३० वर ट्रेड करत आहे. गुरुवारी हा दर ५५ हजार ८४५ रुपयांवर बंद झाला. आज सकाळी तो ५५ हजार ९६५वर सुरू झाला. ५६ हजार १९१ हा आतापर्यंतचा सर्वोच्च दर आहे.

डिसेंबर मध्ये डिलिव्हरी होणऱ्या सोन्याच्या दरात MCXवर १५ रुपयांची तेजी दिसत होती. तो ५६ हजार ३० रुपयांवर ट्रेड करत आहे. गुरूवारी तो ५६ हजार ०१५ च्या स्तरावर बंद झाला होता. आज सकाळी तो ५६ हजार ३४७ वर सुरू झाला.

MCXवर सकाळी १०.४० वाजता सप्टेंबर महिन्यात डिलिव्हरी होणाऱ्या चांदीच्या किमतीत ९८ रुपयांची तेजी होती. तो सध्या ७६ हजार १५० वर ट्रेड करत आहे. गुरुवारी चांदी ७६ हजार ५२ रुपयांवर बंद झाला होता. आज सकाळी बाजार सुरू झाला तेव्हा तो ७७ हजार ९४९ वर सुरू झाला. MCXवर डिसेंबर मध्ये डिलिव्हरी होणाऱ्या चांदीच्या किमती १०६ रुपयांनी वाढल्या होत्या.

दिल्ली सराफा बाजारात गुरुवारी सोन्याच्या किमतीत २२५ रुपयांची तेजी येत तो ५६ हजार ५९० रुपयांवर पोहोचला होता. तर चांदी १ हजार ९३२ रुपयांच्या तेजीसह ७५ हजार ७५५ रुपयांच्या स्तरावर पोहोचला. बुधवारी सोने १० ग्रॅमसाठी ५६ हजार ३६५ वर बंद झाला. तर चांदी ७३ हजार ८२३ प्रती किलोवर बंद झाला होता.