कोरोनाग्रस्त आईचं दूधही बाळासाठी सुरक्षित-WHO

:13-Jun-2020


जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ. टेड्रोस अधानोम घेब्रेयेसुस यांनी कोरोना पॉझिटिव्ह मातांनी बाळांना स्तनपान करणं सुरू ठेवण्याचं आवाहन केलं आहे. जिनिव्हामध्ये आयोजित एका पत्रकार परिषदेत डॉ. ट्रेडोस यांनी म्हटलं, की जागतिक आरोग्य संघटनेने याबाबत संशोधन केलं आहे. या अभ्यासात असं आढळून आलं आहे की, स्तनपानातून विषाणूचा संसर्ग होण्याच्या धोक्यापेक्षाही स्तनपानातून बाळाला होणारे फायदे जास्त आहेत. डॉ. ट्रेडोस यांनी म्हटलं, "प्रौढ व्यक्तींच्या तुलनेत लहान मुलांना कोव्हिड-19 आजाराचा धोका कमी असल्याचं आपल्याला माहिती आहे. मात्र, इतर अनेक असे आजार आहेत ज्यांचा बालकांना अधिक धोका असतो. स्तनपानामुळे असे आजार होत नाहीत. सध्या उपलब्ध पुराव्यांच्या आधारे जागतिक आरोग्य संघटना हे सांगू शकते की, कोरोना विषाणू संसर्गापेक्षा स्तनपानातून मिळणारे फायदे जास्त आहेत." ते पुढे म्हणाले, "ज्या मातांना कोरोना विषाणूची लागण झाल्याची शक्यता आहे किंवा ज्यांना लागण झाली आहे, अशा मातांना स्तनपान करण्यासाठी प्रोत्साहित करण्याची गरज आहे. आईची प्रकृती गंभीर नसेल तर बाळाला आईपासून दूर ठेवू नये."