कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे जातीभेदाच्या भिंती कोसळू लागल्या आहेत?

:13-Jun-2020


प्रयागराज इथल्या गोविंद वल्लभ पंत सामाजिक विज्ञान संस्थेच्या आमच्या टीमने ʹआपत्ती काळातील जातीभेदʹ या विषयाचा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला. कोरोना विषाणूच्या जागतिक संकटकाळात प्रवासी मजूर लॉकडाऊनमुळे नोकरी गमावल्यानंतर दिल्ली, मुंबई, सूरतसारख्या मोठ्या शहरातून पायी, ट्रकमधून आणि शेवटी सरकारने उपलब्ध करून दिलेल्या बस आणि रेल्वेगाड्यातून आपापल्या गावी परतले. गावी परतल्यानंतर या सर्वांनी 14 दिवस सामूहिक क्वारंटाईमध्ये घालवले. तर काही जण होम क्वारंटाईमध्ये होते. आम्ही यातल्या अनेकांच्या मुलाखती घेतल्या. या मुलाखतीतून जे निष्कर्ष निघाले त्या आधारे आम्ही म्हणू शकतो की, सध्या सामाजिक भेदाचा आधार जातीय उतरंडीऐवजी शरीर हा आहे. अस्पृश्यता आता जातीवर अवलंबून नाही जातीवर आधारित अस्पृश्यतेला सध्या आपल्या समाजात दुय्यम स्थान असल्याचं दिसतंय. आज संक्रमणकाळात एकमेकांमधलं सामाजिक अंतर जातीच्या नव्हे तर व्यक्तीच्या एका देहापासून दुसऱ्या देहातल्या अंतराच्या रुपात समोर येतंय.